खिडकीत जेव्हा उभी तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही त्याच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
त्याच्या निथळत्या केसांमधून
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल
पावलांना तुझ्या स्पर्श होता,
तो असल्याचा भास होईल
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा