जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले
पाहू कुठे कळेना, डोळ्यात दाटलेले
डोंगरांच्या रांगा , कोसळून आल्या
भिंती दहा दिशांच्या ढासळून आल्या
पळण्याआधीच माझे, पाय ताठलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले
जगण्याच्या लढाईत, माझीच हार झाली
मरण्याआधीच आशा, जगण्याची ठार झाली
पळतो तरी भयाने, वाटेत गाठलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले
मागे गिधाडे बसली, चाटीत त्याच्या जिभा
पुढे तरसांचा थवा, दात पाजळीत उभा
कुठे उडून जाउ, पंखही छाटलेले
जाउ कुठे कळेना, आभाळ फाटलेले